Uncategorized

शून्य हिंसा…. मुलांसोबत मुलांसाठी…

वर्तमान पत्राचे पान उलटल्यावर रोज काहीना काही मुलांसोबत घडणा-या घटनांच्या बातम्याचे रकाने असतात. आपणही सर्व जण  ह्या सर्व बातम्या संवेदनशील पणे वाचतो. काय असतो या बातम्यांमधील मजकूर….

 • गणवेश नाही म्हणून शिक्षिकेची भर वर्गात मुलीला मारहाण… मुलीची आत्महत्या
 • अल्पवयीन मुली सोबत लैंगिक छळ ……
 • अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचार….
 • अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले….
 • अल्पवयीन मुलांचे सापडणे
 • अल्पवयीन मुलांना शाळेत मारहाण…. शाळेत लैंगिक छळ….. शिक्षिकेने बेदम मारले…..

या आणि अश्या अनेक घटना आपण सर्व जण वाचत असतो …. या वाचना-यापैकी काही आपण सुन्न होतो. काही लोक हताश होतो. काही संवेदनशीला मनांना याचा अधिकच त्रास होतो…..काहीजण काहीतरी केले पाहिजे म्हणून शोध सुरु करतात…..शेवटी सर्व प्रयत्न थांबतात…. काही करायचे म्हणून एकत्रित प्रयत्न सुरु होतात….काहीच्या प्रयत्नांना यश येते तर काही प्रयत्न निष्फळ ठरतात… त्यातूनच निराशा येते पण….. रोज कुणी ना कुणी नवे प्रयत्न सुरूच ठेवतात… स्थिती…काळ… संदर्भ बदलतात. मात्र मुलाचं शोषण हे काही थांबत नाही.

मुळात मुलांसोबत हिसेला सुरुवात हि  सर्वप्रथम कुटुंबात होते हे आपण समजून घ्यायला हवं. आणि हिंसाचार सुद्धा कुटुंबातूनच अधिकांश मुलं शिकत असतात उदाहरण द्यायचे झालेच तर….जेंव्हा मुलं अगदी लहान असते आणि जेंव्हा ते पहिल्यांदा चालायला शिकते….बाळाच्या काही प्रयत्नांमध्ये ते जमिनीवर पडते….कधी कधी तोंडावर आपटते…. तेंव्हा ते खूप रडते आणि त्याचे / तिचे रडणे काहीकेल्या ते थांबवत नाही….. कितीही खेळणी द्या किंवा काही करा…. मात्र एक कृती आपण मोठी माणसे करतो आणि बाळाचे रडणे थांबते…. ती कृती म्हणजे ज्या जागी आपले बाळ पडले असते त्या ठिकाणी आपण त्या जमिनीला मारतो… तेव्हा कुठे बाळ रडण्याचे थांबतो….म्हणजे याचा अर्थ काय….आपल्याला कुणी रडविले कि त्याला आपण परत मारायचे…..हिंसेचा खरा जन्म इथूनच सुरु होतो…….आणि त्याची व्याप्ती वयपरत्वे अनुभवातून वाढत जाते….हिंसेला रोखण्याचे प्रयत्न नाही  झाले तर आपण सर्व मोठी माणसे बोलायला तयार असतो…. वाया गेले त्याचे मुल…..पुन्हा मुलांचा दोष…पण आपण मोठी माणसे काय कृती  करतो आहोत त्याचे भान आपण ठेवत नाही आहोत…आणखीन एक गोष्ट घरांमधून पहावयास मिळते ती म्हणजे सर्व थरात देण्यात येत असणा-या शिव्या…. मुलं सुद्धा घरातूनच शिव्या शिकतात आणि त्या आपल्या मित्रांमध्ये किंवा समाजात वापरतात वयानुसार त्याची सुद्धा व्याप्ती वाढत जाते… हे सांगायला नकोच सांगण्याचा मुद्दा एवढाच कि हिंसेचा जन्म हा घरातूनच सुरु होतो.

मुलांसोबत हिंसा कुठं कुठं होते किंवा होऊ शकते

 • घरात
 • शाळेत
 • रस्त्यावर
 • वस्तीत/सोसायटीत/ अगदी उच्चभ्रू वसाहतीत देखील….
 • राहण्याच्या ठिकाणी (होस्टेल/बालगृह/शिशुगृह/ निवासी संस्था )
 • इस्पितळात
 • प्रवासात
 • प्रवासादरम्यान
 • पोलीस ठाण्यात
 • धार्मिक ठिकाणं
 • संवाद माध्यमातून
 • धार्मिक कार्यक्रमांमध्ये (लग्न – सणावळी )

कश्या माध्यमातून  हिंसा होते

 • online हिंसा (माध्यमांद्वारे )
 • अंधश्रद्धे तून हिंसा
 • सामाजिक चालीरीतींमुळे
 • धर्माच्या नावाखाली होणारी हिंसा

२००७ साली महिला आणि बाल  विकास मंत्रालयाच्या वतीनं मुलांच्या सोबतच्या हिंसेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने एकूण १३ राज्यात हा जम्बो स्टडी घेण्यात आला. आतापर्यंत चा पहिला असा शासनाने केलेला अभ्यास आहे. प्रत्येक राज्यातून जवळपास १४०० मुलांना प्रश्न विचारले गेले. शोषणाच्या मुद्यावर बोलतांना सरळपणे या मुद्द्यांना हात न घालता वेगळ्या पद्धत्ती तयार केल्या गेल्या. त्या मुळे या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांना एक वेगळे वजन आहे.  काय आहेत या अभ्यासाचे निष्कर्ष…. आणि यावर आपली भूमिका काय? या सर्व बाबींवर आपण गांभीर्याने पाहायला हवं.

 • वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचे  बळी जास्तीतजास्त ५ ते १२ या वयोगटातील मुलं आणि मुली होतांना आढळत आहेत.
 • मुलींप्रमाणे मुलं देखील शोषणाचे मोठ्या प्रमाणात बळी थरात आहेत.
 • घरातील आणि खास करून “विश्वासातील माणसे” हि अश्या प्रकारचे शोषण मोठ्या प्रमाणात करत आहेत.
 • अभ्यासातील ७०% शोषण झालेल्या मुलं आणि मुलीनी आपल्या सोबतच्या घटनेची कुठेही वाच्यता केलेली नाही.

वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणासंबंधी माहिती घेतांना शारीरिक शोषणाविषयी निष्कर्ष

 • ३ पैकी २ मुलांसोबत शारीरिक शोषण होत असल्याचे आढळून आलंय.
 • ६९ टक्के शारीरिक शोषणाच्या बळी ठरलेल्या मुलांपैकी ५४.६८% मुलं हि पुरुष मुलं आहेत
 • ५० % पेक्षा अधिक मुलं हि एकापेक्षा अधिक शोषणाचे बळी ठरलेली मुलं आहेत.
 • ८८.६ % एव्हडी मुलं हि आपल्या आई बाबांच्या आणि परिवारातील सदस्यांच्या शोषणाचे बळी ठरले आहेत.
 • ६० % मुलं हि शाळेतील शिक्षेचे बळी ठरले आहेत.  प्रत्येकी ३ पैकी २ मुलांना शाळेतील शिक्षकांकडून शारीरिक शोषणाचे बळी ठरावे लागत आहेत.
 • आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, आणि दिल्ली या राज्यातील मुलांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा अतिशय दयनीय आहे. या राज्यांमधील मुलांना मोठ्या प्रमणात शारीरिक शोषणाला बळी जावं लागतंय.
 • ५०.२ % टक्के मुलांना आठवड्याच्या सातही दिवसांसाठी काम करावं लागतंय.

लैंगिक शोषणाविषयी या अभ्यासातील निष्कर्ष

 • आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी जास्त प्रमाणात मुलं आणि मुलीना लैंगिक शोषणाचे बळी व्हावं लागतंय.
 • २१.९० % मुला-मुलींनी अतिशय गंभीर स्वरूपाच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्याचं सांगितलंय.
 • ५०% मुलं आणि मुलीना इतर वेगवेगळ्या फॉर्म मधल्या लैंगिक शोषणाचा शिकार व्हावं लागलंय.
 • ५.६९ % त्यांच्या सोबतच्या लैंगिक शोषणामुळे दुखापती झाल्याचे सांगितलंय.
 • रस्त्यावर राहणारी मुलं, कामाच्या ठिकाणी राहणारी मुलं आणि निवासी संस्थांमधून राहणारी मुलं यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असल्याचे आढळून आलंय.
 • ५०% मुलांचे लैंगिक शोषण हे त्यांच्या जवळपासच्या विश्वासातील व्यक्तींनी केल्याचे आढळून आलंय.
 • या पैकी ब-याच मुलं आणि मुलींनी आपल्यावर परिणाम झाल्याचं सांगितलंय.

याच अभ्यासात भावनिक शोषणा विषयीचे निष्कर्षदेखील धक्कादायक आहेत.

 • अभ्यासात जवळपास सर्वच मुलं आणि मुलीनी त्यांच्यासोबत भावनिक शोषणाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
 • भावनिक शोषण करणा-यामध्ये ८३% हे मुलांचे पालकच आहेत.
 • ४८.४% मुलींनी सांगितले कि आम्ही मुली असतो तर बरे झालं असतं.

भारतात लग्न समारंभात आणि सणावळीत लहान मुलांचे लैंगिक शोषण होण्याचे प्रमाण अधिक आहे.  १३ राज्यात एकूण २,४४७ मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ५१.९ % मुलगे तर उर्वरित मुली आहेत.  महाराष्ट्र, गुजरात, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या सारखी प्रगत राज्य याही बाबतीत आघाडीवर आहेत.  लग्न समारंभाच्या वेळी मुलाचं लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण ११.३२ %  आहे.  त्यात मुलींचं प्रमाण ५३.६५% एवढे आहे. विवाह आणि सण-समारंभाच्या वेळी गर्दी आणि गोंधळ असतो. जो तो आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटीत मश्गुल असतो मुलांकडे आपसूकच दुर्लक्ष होते. त्या मुळे शोषण करणा-यांना आयती संधीच चालून येते. त्यांच्याकडून लहान मुलांना लक्ष्य केलं जातं. उत्सवी वातावरणामुळे शोषणाच्या घटनांकडे फारशा गंभीरपणे पाहिलं जात नाही.  आम्ही गप्प बसलो किंवा आमच्या तक्रारींकडे लक्षच दिले गेले नाही. अशी तक्रार ८३% मुलांनी पाहणीच्या वेळी केली.

खरंच शक्य आहे का मुलांची हिंसेतून मुक्तता…. आहे का मुलांना संरक्षणाचा अधिकार…..आणि  जेंव्हा आपण संरक्षण म्हणून बोलतो आहोत तर संरक्षण कुणापासून…….कि कुणा कुणा पासून….

हे खरय कि उणीवातूनच जाणीवा तयार होत असतात.

मुलांसोबत हिंसा करणारे स्वताही कधीतरी या हिंसेचा शिकार झालेले आहत. हे वास्तव आहे. हि श्रुखला अशीच सुरु ठेवायची कि थांबवायची हे आता आपल्या समाजाच्या हातात आहे.

अल्पवयीन मुलांमध्ये कुठून येते इतकी हिंसक वृत्ती. मूल्य नितीमत्ता संस्कार यांची पायमल्ली..अधिकार वर्चस्व गाजविण्याची हुकुमत…पुरुषी वृत्ती कश्यातून येते हे सर्व…व्यसनाधीनता…चंगळवाद…लोभ पैशाची लालसा, सहजपणे कष्ट न करता हातात येणारा पोकेटमनी…स्त्रीदेहाचे आकर्षण, इच्छा, वासना कि आणखीन काही…..?

आपल्या कृत्याचे काय परिणाम होतील….आपल्या कृत्यामुळे कुणाला काय सहन करावं लागणार आहे याची मुळात जाणीव होऊ नये….मुलांसोबतच्या हिंसेने मुलं अधिक क्रूर बनविण्यात आपणच पुढाकार घेतोय हे आपण लक्षात घ्यायला हवं.  घर, समाज, संस्कार कायदा…. समाजात वावरतांना मुलांसोबत हिंसेची कृत्ये करतांना काहीतरी धाक हवं कि नको.

समाजात मुलांवरील हिंसेला आळा बसावा म्हणून कठोर कायद्याची तरतूद करण्यात आलीय. बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा २०१५ या मुलांसाठी असणा-या कायद्यात एक स्वतंत्र प्रकरण तयार करण्यात आलंय. या कायद्यातील प्रकरण ९ जे आहे ते मुलांविषयी कुणीही हिंसेच्या घटना किंवा कृत्य घडवीत असतील किंवा स्वतः करत असतील तर कायदा अतिशय कडक आहे. उदाहरण द्यायचे तर आता मुलांना शिक्षा करणे शिक्षक, पालक यांना महागात पडू शकते जर या बाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली तर या कायद्यातील तरतुदीप्रमाणे ५ वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा मुलांना शिक्षा करणा-या व्यक्तीला होऊ शकते.

आपल्या कुटुंब व्यवस्थे मध्ये आजही मुलांना सहज शारीरिक आणि मानसिक शिक्षा, मारहाण, शिवीगाळ केली जाते. काही पालक मुलांवर हाथ देखील उगारतात. या हाथ उगारण्या मागे त्यांची एक भूमिका असते कि आम्ही आमच्या मुलांना शिस्त लावत आहोत. पण मुळात मारून, त्रास देऊन कोणती शिस्त लागते? मुलं मारण्यामुळे सुधारत असतात हा एक मोठा भ्रम आहे. उलट अशी मुलं जेंव्हा संधी मिळते तेंव्हा त्यांच्या वरील राग वेगळ्या भूमिकेतून इतर मुलांवर काढतात असा अभ्यास सांगतो. खरं तर मुलांवर हाथ उगारण्या ऐवजी तो त्यांच्या पाठीवरून फिरावयास हवा. त्या स्पर्शात विश्वास आणि काळजी असावी. मुलं सकारात्मक शिस्तीमुळेच पुढे जाऊ शकतात हे हि विविध अभ्यास स्पष्ट करीत आहेत.

मुलांसोबत घडणा-या हिंसेच्या विविध घटनांमुळे मुलं घरातून निघून जाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. मी मुंबई शहर या जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी असणा-या न्याय व्यवस्थेच्या एक अभ्यासक म्हणून अनुभव पाहता केवळ घरातून होणा-या विविध प्रकरच्या हिंसेमुळे मुलांचे आणि मुलींचे घरातून निघून येण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. घरातील हिंसेला मग ती हिंसा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक स्वरुपाची असल्यामुळे सहन न करता येत असल्यामुळे मुलं घरातून निघून जातात.

मुलांसोबत घडणा-या हिंसेचा एक नुकताच अभ्यास करण्यात आला आहे त्यातील निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत.

 • हा अभ्यास शाळेत जाणारी मुलं, शाळेत न जाणारी मुलं, आश्रम शाळांमधील मुलं, निवासी संस्थांमधील मुलं यांच्या सोबत संवाद साधून माहिती घेतली गेली.
 • मुलांनी मोठ्या प्रमाणात शारीरिक,मानसिक,आर्थिक आणि लैंगिक छळाचे बळी झाल्याचे सांगितले.
 • ६८ टक्के मुलांचे म्हणणे होते कि आम्ही घरी आनंदी आहोत…३२ टक्के मुलं हि आपल्या घरातच असुरक्षित आहेत.
 • शाळांमध्ये होणा-या हिंसेबद्दल अभ्यास सांगतो…मुलींपेक्षा मुलांना शाळांमध्ये अधिक शिक्षा केली जाते या मध्ये १६.६०% प्रमाण वस्तू फेकून मारण्याचे आहे…१४.७७% प्रमाण वर्गाबाहेर उभे ठेवण्याचे आहे… तर हाताने चापट मारण्याचे प्रमाण ५.५७% आहे…कान ओढण्याचे प्रमाण ४.७५% आहे तर मारण्याचे प्रमाण २.२८% इतके आहे.
 • शिक्षक शाळांमधून मदत करतात असे ६४% विद्यार्थी सांगतात पण त्याच वेळेस ५८% मुलं शिक्षकाकडून होणा-या मानसिक छळाचे परिणाम सहन करतात असेही सांगतात.
 • शाळांमध्ये जातांना मुलांना ब-याच अडचणी पार कराव्या लागतात त्या मुळे त्यांना शाळा सोडावी लागते असेही त्यांनी सांगितले. ३३% मुलांनी रस्त्यावरी प्राण्यांमुळे शाळेत जायला भीती वाटते असे सांगितले तर २०% मुलं आणि मुलीनी त्यांच्या शाळेच्या वाटेत टग्या माणसांचा घोळका उभा असतो म्हणून भीती व्यक्त केली. शाळेच्या रस्त्यावर एकटे जावे लागणे, शाळेच्या रस्त्यावरील दारूच्या दुकानांमुळे शाळेत जाण्यास भीती वाटते असंही मुलांनी सांगितलय.
 • मुलं राहत असलेल्या जागा त्याची स्वताची वस्ती मुलांना असुरक्षित वाटते. मुलीना  सार्वजनिक संडास वापरण्यास भीती वाटत्ते कारण घर ते संडास या प्रवासात अनेक पुरुषांच्या नजरांना त्यांना तोंड द्यावे लागते, रात्रीच्या वेळी सार्वजनिक संडासाचा वापर करणे शक्य नसते असंही मुलीनी सांगितले.
 • ज्या मुलांच्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यापैकी ८% मुलांनी आपण लैंगिक अत्याचाराचे बळी आहोत असे सांगितले….७% मुलांनी त्यांना घाणेरडे व्हिडीओ दाखवले गेल्याचे मान्य केले, तर ७% मुलांनी त्यांचे त्यांचे मत विचारात न घेता चुंबन घेतले गेल्याचे सांगितले. ४.५% मुलांनी त्यांना घाणेरडे लैंगिक कृत्यांचे फोटो दाखविले गेल्याचे सांगितले…तर ३% मुलांनी त्यांना त्यांचे लैंगिक अवयव दाखविण्यात सांगण्यात आल्याचे सांगितले तर ३% मुलांनी त्यांना छळ करणा-या व्यक्तीने आपले लैंगिक अवयव दाखविल्याचे सांगितले.
 • लैंगिक भाषेचा उपयोग करून मुलांशी संवाद साधण्यात येत असल्याचे ५० % पेक्षा अधिक मुलांनी सांगितले आणि हा संवाद घरी, वस्तीत आणि शाळेत होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 • विशेष काळजीची गरज असणारी मुलं (ज्यांना आपण अपंग म्हणतो) त्या मुलांनीही आपली छळवणूक होत असल्याचे सांगितले.
 • छळाची घटना घडल्यावर अनेक मुलांनी आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या कडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
 • अनेक मुलांनी आपल्या शाळा, शाळांमधील टोयलेट, शाळांपर्यंत जाण्याचे रस्ते सुरक्षित नाहीत असे सांगितले.

मुलांसोबत त्यांच्या सोबत होणा-या हिंसेला आपण मोठी माणसे कसे बघतो. यावर या मुलांचा विकास अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण मुलांच्या सोबतच्या होणा-या हिंसेला त्यात मुलाची काही चूक नाही असे मानून हिंसेपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हिंसा करणारा जेव्हडा दोषी आहे तेवढाच हिंसा होत असल्याचे समजून सुद्धा आपल्या मुलांना मदत करण्यास टाळाटाळ करीत असेल तर ते योग्य नाही. मुलांसोबतची हिंसा संपविण्यासाठी आपण स्वतापासून सुरुवात करायला हवी.  आपल्या मुलां सोबतचा आपला संवाद वाढविला पाहिजे. त्याच वेळेस आपला आपल्या मुलांवर विश्वास देखील असला पाहिजे. मुलाच्या योग्य कृतीचे समर्थन करतांना आपल्या मुलांकडूनही कुणाला इजा पोहचवली जात नाहीये ना… याची हि काळजी आपण घ्यायला हवी. हिंसेचे समर्थन कधीही नाही..हिंसा मुक्त समाज निर्माण करण्यासाठी हिंसामुक्त घर आणि घरातील वातावरण इथून आपण सुरुवात करूयात….रोज शून्य हिंसा आपल्या घरात आपल्या मुलांसोबत…..

हे करायला हवे

 • हिंसेबद्दल बिनधास्त बोला
 • त्वरित कृती करूयात
 • हिंसा मुक्त समाज शक्य आहे.

 या ६ भूमिका आपण पाळूयात:-

 • पालकांसोबत संवाद आणि पालकांचा संवाद मुलांसोबत वाढवा म्हणून प्रयत्न त्या साठी पालकांचं शिबीर आपण घ्यायला हवं. पालकांचा गट  तयार करायला हवा.
 • मुलांना आणि खास करून किशोरवयीन मुलांसोबत काम करायला हवे. मुलांना हिंसेची व्यापकता समजून सांगत त्याच वेळी हिंसेपासून स्वताची सोडवणूक करून घेण्यासाठी काय करता येईल यावर त्यांच्या सोबत सतत संवाद.
 • समाजात लिंग समभाव आणण्यासाठी समाजाची मानसिकता तयार करण्यासाठीचे विशेष प्रयत्न
 • मुलांसाठी खास व्यवस्था तयार करणे जेणेकरून मुलांसाठी हिंसा रोखण्यात यश येईल. मुलांसाठी वस्तीपातळीवर Child Resource Center तयार करता येतील.
 • मुलांच्या संरक्षणासाठी असणा-या व्यवस्था आणि कायदे याची माहिती करून घेत त्या बद्दल पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जागृती करणे.
 • समाजात घडणा-या अश्या हिंसेच्या घटनांची नोंदी घेत त्यावर पैरवी (Advocacy) करणे
 • संतोष शिंदे, बाल संरक्षण अभ्यासक
 • विधायक भारती   

By Vidhayak Bharti

"Vidhayak Bharti is a rights-based, non-profit working for the promotion and preservation of child rights and child protection in society. The UN Convention on the Rights of the Children and the Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, 2015 (JJ Act) forms the backbone of our projects and programs. We work directly in Mumbai, Nandurbar, Solapur & Kolhapur districts and indirectly across Maharashtra."

Leave A Comment

Your Comment
All comments are held for moderation.

× How can I help you?